सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल: कोट्यवधीच्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:04 PM2019-12-20T12:04:41+5:302019-12-20T12:08:59+5:30
सिटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे, व्हेंटीलेटर यांसह इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली आहेत; मात्र तंत्रज्ञाअभावी रुग्णालय परिसरातच ते पडून आहेत.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. या रिक्त पदांमुळे रुग्णालयासाठी आलेल्या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झालेले नाही. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील चारही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाची घाई केली जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती.
हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच काही वैद्यकीय उपकरणेही येथे दाखल झाली; मात्र या वैद्यकीय उपकरणांच्या इन्स्टॉलेशनसाठी आवश्यक तंत्रज्ञच उपलब्ध नाहीत. परिणामी, कोट्यवधीचे हे वैद्यकीय उपकरणे निर्माणाधीन इमारतीच्या परिसरातच ठेवण्यात आली आहेत. चारही सुपर स्पेशालिटीची ही स्थिती असताना केंद्र सरकारकडून होत असलेल्या उद्घाटनाच्या घाईमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढविली आहे.
केंद्राकडे पद मंजुरीची शिफारस
पद मंजूर नसताना केंद्र सरकारकडून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद््घाटनाबाबत पत्र पाठविण्यात आले; परंतु पदच नसताना हे शक्य नाही. ही बाब लक्षात घेता उद््घाटनापूर्वी पद मंजुरी द्यावी, अशी शिफारस करणार असल्याचे आश्वासन राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिल्याची माहिती एकाच उच्चपदीय वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
या उपकरणांचे इन्स्टॉलेशन नाही
सिटी स्कॅन, एमआरआय, हार्ट चेक-अप उपकरणे, एक्स-रे, व्हेंटीलेटर यांसह इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणे आली आहेत; मात्र तंत्रज्ञाअभावी रुग्णालय परिसरातच ते पडून आहेत.
हे उपचार होणार शक्य
या वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टॉलेशन झाल्यास रुग्णांना कर्करोग, मूत्रपिंड, एंडोक्राइनोलॉजी, कार्डियोलॉजी, सीटीव्हीएस, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी आणि इतर रोगांवर तांत्रिक उपचार करणे शक्य होणार आहे, तसेच सुपर स्पेशालिटी ब्लॉक किंवा ट्रॉमा सेंटर आणि इतर आवश्यक सुविधा मिळणे शक्य होणार आहे.