सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनमधून डिझेल गळती; अधिकारी अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:49 PM2024-02-22T18:49:18+5:302024-02-22T18:49:30+5:30
हा प्रकार लक्षात येताच लोकोपायलटने न्यू तापडीयानगर भागातील पुलावर रेल्वे थांबविली.
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या हुजुर साहिब नांदेड ते श्री गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनमधून डिझेल गळती झाल्याची घटना अकोला येथील न्यू तापडीयानगर भागातील पुलावर गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. वेळीच प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी टाकीची दुरुस्ती केल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली.
नांदेड येथून श्री गंगानगरकडे जात असलेली २२७२३ हुजुर साहिब नांदेड-श्री गंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी शिवणी स्थानक पार केल्यानंतर अकोला स्थानकाकडे येत असताना डिझेलची गळती सुरु झाली. हा प्रकार लक्षात येताच लोकोपायलटने न्यू तापडीयानगर भागातील पुलावर रेल्वे थांबविली. तोपर्यंत प्रवाशांनाही याबाबत माहिती झाल्याने खळबळ उडाली होती. लोकोपायलट व त्याच्या सहकाऱ्याने प्रसंगावधान दाखवत तातडीने टाकीची दुरुस्ती केली. गळती पूर्णपणे बंद झाल्याची खात्री झाल्यानंतर गाडी अकोला स्थानकावर आली. तेथून ही गाडी श्री गंगानगरकडे रवाना करण्यात आली.
अकोला स्थानकावरील अधिकारी अनभिज्ञ
हमसफर एक्स्प्रेसच्या जनरेटर कारमधून डिझेलची गळीत झाल्याचे व्हिडीओ व छायाचित्र व्हायरल झाले. तथापि, या गंभीर प्रकाराबाबत अकोला व शिवणी स्थानकावरील अधिकारी मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत 'लोकमत'ने विचारणा केली असता कोणतीही माहिती नसल्याचे तेथील अधिकऱ्यांनी सांगितले.