पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:54 AM2020-06-27T09:54:37+5:302020-06-27T09:55:54+5:30
रुपेंद्र गोरे यांना निलंबित करण्याचा आदेश महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी गुरुवार, २५ जून रोजी दिला आहे.
पारस : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेचे कंत्राट स्वत:च्या मुलाला दिल्याचा ठेपका ठेवत वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता तथा उपमुख्य अभियंता रुपेंद्र गोरे यांना निलंबित करण्याचा आदेश महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी गुरुवार, २५ जून रोजी दिला आहे.
पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे अधीक्षक अभियंता तथा उपमुख्य अभियंता रुपेंद्र गोरे यांचे चिरंजीव रूचांग रुपेंद्र गोरे यांच्या नावाने असलेल्या श्री साई इंटरप्राईजेस या एंटरप्राइजेसला फ्लाय अॅश उचलण्याचा कंत्राट देऊन अधीक्षक अभियंता रुपेंद्र गोरे यांनी पदाचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाचा बडगा उचलण्यात आला आहे. श्री साई इंटरप्राईजेसने आतापर्यंत २०० मेट्रिक टन राखेची उचल केली आहे. त्यामुळे स्वत:च्या मुलाच्या व्यवसायाची वृद्धी होण्याकरिता अधीक्षक अभियंता रुपेंद्र गोरे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निलंबन पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
सदर प्रकार हा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी सेवा वि. नियम २०१५ नुसार कर्मचारी वर्तणूक, शिस्त, सेवा विनियम क्रमांक ८५ सर्वसाधारण, (ढ) (१) अन्वये मंडळाची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही व्यापार करीत असेल किंवा त्या व्यक्तीच्या नावावर विम्याचा किंवा दलालीचा व्यवसाय असेल तर सक्षम अधिकाºयास तसे कळविले पाहिजे, अशी कंपनीच्या अधिनियमामध्ये तरतूद आहे. गोरे यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत कंपनीस कळवलेले नसल्याचाही आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपणास हा निलंबन आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करीत असल्याचे संचालक चंद्रकांत थोटवे यांनी निलंबन आदेशात स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)