पोलिस अधीक्षकांनी साधला शाळांच्या गुरूजींशी संवाद!
By नितिन गव्हाळे | Published: February 4, 2024 03:39 PM2024-02-04T15:39:38+5:302024-02-04T15:44:23+5:30
पोलीस दलातर्फे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजनांबाबत चर्चा
अकोला: अकोला शहर हे शैक्षणिकदृष्टया अत्यंत महत्वाचे शहर असुन अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, जळगाव खान्देश आदी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी अकोला शहरात येतात. खाजगी निवासस्थान किंवा वसतिगृहात राहून विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी चर्चा केली आणि विद्यार्थी सुरक्षा संबंधाने उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
चर्चासत्रामध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी समस्या मांडल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सर्व शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देत, विद्यार्थी सुरक्षा ही पोलिसांची पहिली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करीत, पोलिस दलातर्फे विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्याचे सांगीतले. चर्चासत्रामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यकमाच्या दरम्यान हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याबाबत पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी पोस्टर हे नवक्रांती शिक्षक संघटनेचे उमेश म्हसाये, जिल्हाध्यक्ष अजय पाटील संकल्पनेतुन तयार करण्यात आले होते.
शाळांना भेट देऊन ठाणेदार साधतील विद्यार्थ्यांशी संवाद
चर्चेदरम्यान पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी विद्यार्थी सुरक्षेविषयी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळेवर शहरात दामिनी पथक, पोस्टे बिट मार्शल व मोबाइल पेट्रोलिंग यांनी सर्तक पेट्रोलिंग करून वाहतुक नियोजन करावे. तसेच शाळेला भेट द्यावी. ठाणेदारांनी आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेजांची यादी तयार करून आठवड्यातून प्रत्येक शाळेला भेट देण्याचे नियोजन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे सांगितले आहे.