पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 10:07 AM2020-06-28T10:07:15+5:302020-06-28T10:07:40+5:30
नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची अमरावती येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलीस अधीक्षक म्हणून जी. श्रीधर यांची वर्णी लागली असून, त्यांनी अमोघ गावकर यांच्याकडून पदभार स्वीकारत कामकाजास प्रारंभ केला.
मूळचे तामिळनाडू राज्यातील गोविंदराजन श्रीधर यांनी यापूर्वी बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कारभार सांभाळलेला आहे. तत्पूर्वी औरंगाबाद ग्रामीणचे ते सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर नागपूर येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ४ चे समादेशक असतानाच त्यांची अकोला पोलीस अधीक्षक पदावर शुक्रवारी बदली झाली. त्यांनीही शनिवारी तातडीने हजर होत अमोघ गावकर यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. जी. श्रीधर हे तरुण, तडफदार, मनमिळाऊ आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात हतखंडा असलेले पोलीस अधिकारी असल्याची चर्चा असून, शिस्तप्रिय असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यावेळी दोन्ही पोलीस अधीक्षकांमध्ये जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी विषयावर चर्चा झाली.