सुपरस्पेशालिटी: सहा महिन्यांपूर्वीच मिळाली पदांना मंजुरी, पद भरतीचा मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:37+5:302021-07-05T04:13:37+5:30
अकाेला : राज्यातील चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी पहिल्या टप्प्यातील ८८८ पदांना जानेवारी २०२१ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यामुळे राज्यातील चारही ...
अकाेला : राज्यातील चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी पहिल्या टप्प्यातील ८८८ पदांना जानेवारी २०२१ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यामुळे राज्यातील चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालये लवकरच सुरू होणार, अशी अपेक्षा होती. मात्र पदांना मंजुरी मिळून सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली नाही. अनेकांना या पद भरतीची प्रतीक्षा आहे, मात्र राज्य शासनाला मुहूर्त सापडेल कधी, असा प्रश्न बेरोजगारांमधून उपस्थित होत आहे.
राज्यातील चारही प्रस्तावित सुपरस्पेशालिटी रुग्णालयांसाठी वर्ग १ ते वर्ग ४ संवर्गातील १,८४७ पदे प्रस्तावित आहेत. ही पदे तीन टप्प्यांमध्ये भरली जाणार असून, पहिल्या टप्प्यांतर्गत अकोल्यासह यवतमाळ आणि लातूर येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी २२३, तर औरंगाबाद सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी २१९ पदे निश्चित करण्यात आली होती. या पद निर्मितीला मंजुरी मिळून सुमारे सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या पदांच्या वेतनावर पहिल्या वर्षी ४२ कोटी ९९ लाख २३ हजार ५६८ रुपये वर्षिक खर्च करण्यास शासनाने मान्यताही दिली होती. त्यामुळे २०२१ मध्ये राज्यातील चारही सुपरस्पेशालिटी रुग्णालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता, मात्र महिनाभरातच कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. त्यामुळे पद भरतीची प्रक्रिया पुन्हा रेंगाळली असून त्यासाठी राज्य शासनाला मुहूर्त कधी मिळणार, याकडे बेरोजगारांचे लक्ष लागून आहे.
ही पदे भरणार...
संवर्ग - जिल्हा
- औरंगाबाद - यवतमाळ - लातूर - अकोला -
गट - अ - ०७ - ०९ - ०९ - ०९
गट - ब - ०८ - १० - १० - १०
गट -क (नियमित) - ९७ - ९७ - ९७ - ९७
गट - क (बाह्यस्रोत) - ०७ - ०७ -०७ - ०७
गट - ड (कंत्राटी) - ८६ - ८६ - ८६ - ८६
वरिष्ठ निवासी - १ - ०५ - ०५ - ०५ - ०५
वरिष्ठ निवासी - २ - ०५ - ०५ - ०५ - ०५
वरिष्ठ निवासी-३ - ०४ - ०४ - ०४ - ०४
---------------------------------------
एकूण - २१९ - २२३ - २२३ - २२३