बोगस साहित्याचा पुरवठा; चार पुरवठादार कायमस्वरूपी काळ्या यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:28 PM2019-05-19T13:28:19+5:302019-05-19T13:28:24+5:30
शेतकऱ्यांना बोगस साहित्याचा पुरवठा केल्याप्रकरणी राज्यातील चार पुरवठादारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.
अकोला : शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात राबविलेल्या विदर्भ पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना बोगस साहित्याचा पुरवठा केल्याप्रकरणी राज्यातील चार पुरवठादारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पुरवठादाराचा समावेश आहे.
शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या पाहता शासनाने २००५ मध्ये विदर्भ विशेष पॅकेज घोषित केले होते. त्या पॅकेजमध्ये १८ घटक योजनांचा समावेश होता. त्यापैकी उत्पादन वाढीसाठी शेतकºयांना आर्थिक मदत योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाकडे होती. त्या योजनेत सहा जिल्ह्यांतील ६० हजार शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात आली. त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ही योजना राबविताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. महाराष्ट्र फलोत्पादन व औषधे वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गोपाळ रेड्डी यांच्या त्रिसदस्यीय समितीने १ सप्टेंबर २००८ रोजी शासनाला अहवाल सादर केला. त्यामध्ये पॅकेज अंतर्गत पुरवठा केलेल्या साहित्यापैकी काही खराब, सदोष असल्याचे नमूद केले. त्यानुसार ते साहित्य बदलवून किंवा दुरुस्त करून देण्याचा आदेश संबंधित पुरवठादाराला देण्यात आला. त्यानंतर सातत्याने सूचना देऊनही पुरवठादारांनी साहित्य बदलवून देणे किंवा दुरुस्ती केली नाही. त्यामुळे शासनाने ३१ जुलै २०१० रोजी चार पुरवठादारांना दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली.
दरम्यान, विदर्भ पॅकेज अंतर्गत केलेल्या कारवाईबाबत विधानसभा आश्वासन समितीने संबंधित पुरवठादार त्या दोन वर्षांनंतरही निकृष्ट साहित्याचा पुरवठा करू शकतात. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली. त्यावर कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने १६ मे रोजी आदेश देत चार पुरवठादारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे.
- काळ्या यादीत टाकलेले पुरवठादार
अकोला जिल्ह्यातील मे. धारस्कर इंजिनिअरिंग वर्क्स मूर्तिजापूर, मे. जगदंबा अॅग्रो इंजिनिअरिंग, जालना, मे. विजय विलियन्स कंपनी, गोवंडी चेन्नई, मे. सदर्न अॅग्रो, द्वारा अंबिका इंजिनिअर्स गोरेगाव पूर्व मुंबई.
- या साहित्याचा केला होता पुरवठा
पॅकेजमधून शेतकºयांना जमीन सुधारणा, निविष्ठा वाटप, शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी, रेडे जोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाइपलाइन, पंप संच, पुष्पोत्पादन, परसबाग, जैविक खते, नॅडेफ, गांडूळ खत, शेड उभारणी यावर निधी खर्च करण्यात आला होता.