अकोला मंडळाला ‘पीपीई’ किट, मास्कचा पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:18 PM2020-04-19T17:18:29+5:302020-04-19T17:18:40+5:30
हाफकिनमार्फत आरोग्य सेवेच्या अकोला मंडळाला ‘पीपीई’ किटसह मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे.
अकोला: कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासन युद्धपातळीवर योजना आखत असून, तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदे भरणार आहे. दुसरीकडे हाफकिनमार्फत आरोग्य सेवेच्या अकोला मंडळाला ‘पीपीई’ किटसह मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. या साहित्य वितरणाचे नियोजन केले जाणार असून, त्यामध्ये सर्वाधिक साहित्य यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याला पुरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आरोग्य सेवेच्या अकोला मंडळात अकोल्यासह अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले; मात्र यवतमाळ आणि बुलडाणा हे दोन्ही जिल्हा हाय रिस्क झोनमध्ये मोडतात. ही परिस्थिती पाहता, कोरोनाविरुद्धची लढाई आणखी प्रबळ करण्यासाठी आरोग्य सेवा, उपसंचालक कार्यालयांतर्गत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दुसरीकडे हाफकिनकडे सुरक्षा साधनांची मागणीदेखील करण्यात आली होती. त्यानुसार हाफकिनमार्फत विभागाला ३१९ ‘पीपीई’ किट, ७३ हजार मास्क (एन-९५ मास्कचाही समावेश) आणि मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचाही पुरवठा करण्यात आला आहे. हाफकिनमार्फत हे साहित्य पाठविण्यात आले असून, लवकरच अकोल्यात पोहोचणार आहे. यानंतरच आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये त्याचे वितरण करणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचाही पुरवठा
विभागात कोरोनाचा प्रादुभाव लक्षात घेता, वैद्यकीय कर्मचारी कोरोना बाधितांच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला मंडळाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचाही पुरवठा करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. रियाझ फारूकी यांनी दिली.
जिल्हानिहाय होणार वितरणाचे नियोजन
हाफकिनमार्फत आरोग्य सेवा अकोला मंडळासाठी ‘पीपीई’ किट, एन-९५ मास्क, सॅनिटायझर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करण्यात आला आहे. या सर्वांचे पाचही जिल्ह्यांत आवश्यकतेनुसार वितरण केले जाणार आहे. कोरोनामुळे अधिक प्रभावित जिल्ह्यांना प्राधान्याने ही साधने पुरविण्यात येणार असून, आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत तसे नियोजन केले जाणार आहे.
हाफकिनकडे ‘पीपीई’ किट, एन-९५ मास्क, सॅनिटायझर आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधांची मागणी करण्यात आली होती. त्याचा पुरवठा हाफकीनमार्फत झाला असून, हे साहित्य लवकरच अकोल्यात पोहोचणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय वितरणाचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
- डॉ. रियाझ फारूकी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ.