अकोला मार्गे सूरत - ब्रह्मपुर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस बुधवारपासून
By Atul.jaiswal | Published: November 4, 2023 05:47 PM2023-11-04T17:47:34+5:302023-11-04T17:48:04+5:30
गाडीला भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे.
अकोला : आगामी दिवाळी व पुढील महिन्यातील नाताळ सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने गुजरात राज्यातील सुरत ते ओडीशा राज्यातील ब्रह्मपूर या दोन शहरांदरम्यान येत्या बुधवार, ८ नोव्हेंबरपासून अकोला मार्गे साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष भाडे असलेल्या सुरत-ब्रह्मपूर-सुरत साप्ताहिक विशेषच्या अप व डाऊन अशा प्रत्येकी आठ फेऱ्या होणार असून, डिसेंबर अखेरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे.
मध्य रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०९०६९ सूरत-ब्रह्मपुर विशेष एक्स्प्रेस ८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत सुरत स्थानकावरून वरून प्रत्येक बुधवारी १४:२० वाजता सुटेल व शुक्रवारी ब्रह्मपूर येथे ०१:१५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी रात्री ०९:३२ वाजता येणार आहे.
परतीच्या प्रवासात ०९०७० ब्रह्मपुर-सुरत एक्स्प्रेस १० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत ब्रह्मपुर स्थानकावरून वरून प्रत्येक शुक्रवारी ०३:३० वाजता सुटेल व सुरत येथे शनिवारी १३:४५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी पहाटे ०४:३९ वाजता येणार आहे.
या स्थानकांवर थांबा
या गाडीला भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे. या गाडीला एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत, दोन द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, सहा तृतीय श्रेणी वातानुकुलीत, आठ द्वितीय श्रेणी शयनयान व तीन जनरल डबे राहणार आहेत.