टंगटायच्या ३० बालरुग्णांवर शस्त्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 03:09 PM2020-03-02T15:09:32+5:302020-03-02T15:09:42+5:30
रविवार १ मार्च रोजी शहरातील खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत रविवारी ३० बाल रुग्णांवर टंगटायची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेमुळे या बालकांचे व्यंगत्व कमी होणार असून, त्यांना होणारा त्रासही कमी होण्यास मदत मिळेल.
जिल्हा स्त्री रुग्णालय येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत टंगटायच्या बाल रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली होती. यामध्ये ३० बालरुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. या बाल रुग्णांवर रविवार १ मार्च रोजी शहरातील खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शालेय स्तरावर राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत या रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. यावेळी ज्या विद्यार्थ्यांना वाचा दोष, जन्मत:च जीभ चिटकलेली, बोबडे बोलणे या सारखे दोष आढळून आलेल्या बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकुमार कांबळे व त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले.
व्यंगत्व कमी करण्यास होईल मदत
जन्मत:च चिटकलेली जीभ, बोलताना होणारा त्रास शिवाय बोबडे बोलणे यावर वेळीच उपचार मिळाल्यास अशा रुग्णांचे व्यंगत्व कमी होण्यास मदत होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत अशाच ३० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या बालकांना स्पष्ट बोलता यावे, यासाठी त्यांना स्पिच थेरेपी दिली जाणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गथ हृदयरोग, हर्नियासह टंगटायच्या बाल रुग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहेत. उपक्रमांतर्गत रविवारी ३० बालकांवर टंगटायच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक , अकोला