सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रिया ‘फेल’!
By Admin | Published: August 6, 2016 01:59 AM2016-08-06T01:59:23+5:302016-08-06T01:59:23+5:30
स्वत:च केलेली शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञाने ठरविली चुकीची, रुग्णांच्या आरोग्यासोबत खेळ.
अकोला, दि. ५: सर्वोपचार रुग्णालयात वृद्ध महिला रुग्णावर मे महिन्यात चुकीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने, तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची वेळ रुग्णालयातील डॉक्टरमुळे आली आहे. विशेष म्हणजे, ज्या अस्थिरोग तज्ज्ञाने महिलेवरील शस्त्रक्रिया केली होती, त्याच अस्थिरोग तज्ज्ञाने ही शस्त्रक्रिया चुकीची ठरविली आहे. यावरून सर्वोपचार रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील संग्रामपूर येथील सुधा अरुण कतले(६0) या महिलेची कमर दुखत असल्याने, तिला मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. वृद्ध महिला बीपीएल कार्डधारक असल्याने तिच्यावर जीवनदायी योजनेंतर्गत ३0 मे रोजी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान कमरेमध्ये कृत्रिम जोड बसविण्यात आला. त्यानंतर ४ जूनला वृद्धेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी गेल्यावर काही दिवसातच वृद्धेच्या कमरेमध्ये पुन्हा वेदना होऊ लागल्या. वेदना वाढल्यामुळे १६ जुलै रोजी वृद्धेला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञाला दाखविण्यात आले. याच अस्थिरोग तज्ज्ञाने वृद्धेवर शस्त्रक्रिया केली होती.
त्यानेच सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे वृद्ध व तिच्या नातेवाइकांना सांगितले आणि आता पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असून, त्यासाठी ६0 हजार रुपये खर्च येईल, असेही या अस्थिरोग तज्ज्ञाने सांगितले. वृद्ध व तिच्या नातेवाइकांनी गरीब परिस्थितीमुळे एवढी रक्कम कुठून आणावी? तुम्हीच शस्त्रक्रिया केली असल्याने आम्ही तुमच्याकडे आलो, असे सांगितले; परंतु या डॉक्टरने त्यांना सर्वोपचार रुग्णालयाचा रस्ता दाखविला. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वृद्धेला २१ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु अद्यापपर्यंंतही वृद्धेवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. जीवनदायी योजनेतून वृद्धेची शस्त्रक्रिया करायची आहे; परंतु त्याची मंजुरी अद्याप मिळाली नसल्यामुळे शस्त्रक्रिया थांबलेली आहे. ज्या अस्थिरोग तज्ज्ञाने ही शस्त्रक्रिया केली. त्याच अस्थिरोग तज्ज्ञाने ती चुकीची ठरविली. यावरून खासगी रुग्णालयातील डॉक्टर सर्वोपचार रुग्णालयामध्ये काम करताना किती गंभीर आहेत, हे दिसून येते. सर्वोपचार रुग्णालयात काम करण्यासाठी शासन त्यांना लाखो रुपयांचे मानधन देते; परंतु त्याची जाणीव न ठेवता, हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करतात, हेच यातून अधोरेखित होते.