शस्त्रक्रियेतील हेराफेरीचा ‘स्क्रू’ ‘एमसीआय’च्या कोर्टात!
By admin | Published: July 7, 2014 12:39 AM2014-07-07T00:39:13+5:302014-07-07T00:49:29+5:30
डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची मागणी, राज्याच्या आरोग्य विभागाचा पुढाकार
अकोला- गोरेगाव येथील इसमाच्या पाठीच्या मणक्यांवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेतील हेराफेरी प्रकरणाची तक्रार आता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडेही (एमसीआय) करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ. मीना लोचणी यांनी ही तक्रार एमसीआयकडे केली असून, दोन्ही डॉक्टरांची चौकशी करून त्यांचे परवाने निलंबित तसेच सिटी हॉस्पिटललाही कायमस्वरूपी बंद करण्याची शिफारस करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. गोरेगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांच्यावर रामदासपेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत वाघ यांच्या पाठीमध्ये दोन स्क्रू टाकण्यात आले; मात्र काही वेळेतच स्क्रू पुन्हा काढण्यात आले. यामध्ये सिटी हॉस्पिटल प्रशासनासह डॉक्टरांनी शस्त्रक्रियेमध्ये हेराफेरी करून रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण केला. या शस्त्रक्रियेमुळे वाघ यांच्या पाठीचा त्रास वाढल्याने त्यांचा मुलगा बजरंग वाघ याने डॉक्टरांवर कारवाईसाठी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवर पोलिसांनी कारवाई न केल्याने ह्यलोकमतह्णने हा प्रकार उघडकीस आणताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तीचे उपचाराविना निधन होऊ नये, यासाठी गरिबांकरिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतरचे छायाचित्र सादर करावे लागतात. नोंदणी झाल्यानंतर जीवनदायी योजनेतून संबंधित रुग्णालयाला शस्त्रक्रियेचा मोबदला देण्यात येतो. यामध्ये मोबदला थेट रुग्णालय प्रशासनाला मिळत असल्याने काही रुग्णालय आणि डॉक्टर संगनमताने या योजनेचा मलिदा लाटण्याचे प्रकार करीत असल्याचे यावरून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने तीन समित्या नेमून चौकशी सुरू केली असून, डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यात यावे, यासाठी थेट एमसीआयकडेही तक्रार देण्यात आली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणार्या या गंभीर प्रकरणामध्ये आता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशी अहवालावरच फौजदारी कारवाई अडकलेली असून, त्यांच्या अहवालानंतरच ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.