'आरबीएसके' अंतर्गत ४२ रुग्णांवर 'टंगटाय'ची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 03:20 PM2019-02-27T15:20:42+5:302019-02-27T15:22:37+5:30
अकोला: राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सोमवारी ४२ बालकांवर टंगटायची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित बालकांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
अकोला: राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सोमवारी ४२ बालकांवर टंगटायची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित बालकांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गत वर्षभरात शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेंतर्गत ६५ विद्यार्थ्यांमध्ये टंगटायची समस्या आढळून आली. प्राथमिक तपासणीनंतर या बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने पहिल्या टप्यात सोमवार २५ फेब्रुवारी रोजी ४२ बालकांवर टंगटायची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. नंदकिशोर सलामपुरिया व डॉ. मयूर अग्रवाल यांनी केली. या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.बी. राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
काय आहे टंगटाय?
टंगटाय म्हणजेच जीभ बांधून ठेवणे. ही समस्या मुळात जन्मत:च मुलांमध्ये असते. यामध्ये जीभेच्या खालच्या बाजूचा भाग जाड असल्याने जीभेची योग्य हालचाल होत नाही. जीभेला बांधून ठेवल्याप्रमाणे ही स्थिती असते. त्यामुळे जीभ टाळूपर्यंत पोहोचत नाही. परिणामी त्यांच्या बोलण्याचा उच्चार बोबडा निघतो.
पोटाचे विकारही संभावतात
ज्या मुलांना टंगटायची समस्या आहे, अशांना ग्रहण केलेले अन्न नीट चघळता येत नाही. या प्रक्रियेतून खाद्य पदार्थ योग्य प्रकारे पचनसंस्थेत पोहोचत नसल्याने पोटाच्या विकारांना समोरे जावे लागते.
राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत तपासणी अंतर्गत ६५ विद्यार्थी टंगटायने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. यातील ४२ रुग्णांवर सोमवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित रुग्णांवर आठवडाभरात शस्त्रक्रिया केली जाईल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला