जिल्ह्यात भिकाऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:31+5:302021-03-22T04:17:31+5:30
अकोला : ‘भिकारीमुक्त जिल्हा’ संकल्पनेत जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या मुख्यालयी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाच्या पथकामार्फत भिकाऱ्यांचे सर्वेक्षण शनिवारी ...
अकोला : ‘भिकारीमुक्त जिल्हा’ संकल्पनेत जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या मुख्यालयी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाच्या पथकामार्फत भिकाऱ्यांचे सर्वेक्षण शनिवारी पूर्ण करण्यात आले असून, सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे प्राप्त होणार आहे.
मुंबइ भिक्षेकरी प्रतिबंधक अधिनियम १९५९ अंतर्गत जिल्ह्यात ‘भिकारीमुक्त जिल्हा’ संकल्पनेत जिल्ह्यातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पथकामार्फत प्रारंभी अकोला शहरात भिकाऱ्यांचे सर्वेक्षण गत महिन्यात पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षण अहवालानुसार अकोला शहरात १३७ भिकारी आढळून आले. त्यानंतर जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांच्या मुख्यालय क्षेत्रांत पोलीस विभाग आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त प्रशिक्षित पथकामार्फत १५ ते २० मार्च या कालावधीत भिकाऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. संबंधित पथकाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवार, २२ मार्च रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे प्राप्त होणार असून, हा अहवाल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर करणार आहेत.
‘भिकारीमुक्त जिल्हा’ संकल्पनेत जिल्ह्यातील सातही तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी पोलीस विभाग व जिल्हा महिला बालविकास विभागाच्या संयुक्त प्रशिक्षित पथकामार्फत भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याची मोहिम राबविण्यात आली. २० मार्च रोजी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सर्वेक्षणाचा अहवाल २२ मार्च रोजी प्राप्त होणार आहे. हा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात येणार आहे.
विलास मरसाळे
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी