प्रतिबंधित क्षेत्रातील दुर्धर आजारग्रस्तांचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:23 PM2020-06-17T17:23:26+5:302020-06-17T17:23:33+5:30
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यास मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
अकोला : शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दुर्धर आजारग्रस्तांचे आरोग्य तपासणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्यामध्ये 'कोरोना 'ची लक्षणे आढळून आलेल्या २०४ संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे (थ्रोट स्वॅब ) नमुने घेण्याचे काम बुधवारपासून आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी दिली.
अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता , शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात २०४ दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींना 'कोरोना ' ची लक्षणे आढळून आल्याने , दुर्धर आजारग्रस्त या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्याचे काम १७ जूनपासून आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. दुर्धर आजारग्रस्त रुग्णांची आरोग्य तपासणी आणि संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्रावाचे नमुने तातडीने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने, शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यास मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.