हातगाव येथील घरकुलाचा सर्व्हे चुकीचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:02+5:302021-04-10T04:18:02+5:30
मूर्तिजापूर : हातगाव ग्रामपंचायतींतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधील नमुना-ड यादीतील सर्व्हे चुकीचा व अर्धवट करून अल्पसंख्याक, ओबीसी संवर्गातील पात्र लाभार्थ्यांची ...
मूर्तिजापूर : हातगाव ग्रामपंचायतींतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधील नमुना-ड यादीतील सर्व्हे चुकीचा व अर्धवट करून अल्पसंख्याक, ओबीसी संवर्गातील पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप हातगाव येथील सरपंच अक्षय राऊत यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनातून केला होता. तसेच या पात्र लाभार्थींची नावे यादीत समाविष्ट करावी, अन्यथा ८ एप्रिल २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. अखेर गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
हातगाव ग्रामपंचायत प्रधानमंत्री आवास योजनेतील नमुना-ड ची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत केवळ मागासवर्गीय अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थींची १०० नावे असून, उर्वरित दोन नावे अनुसूचित जमाती संवर्गातील लाभार्थींची, इतर संवर्गातील लाभार्थींची केवळ तीनच नावे आहेत. सर्व्हे अर्धवट केल्याने जवळपास ३०७ लाभार्थींना योजनेपासून वंचित राहावे लागण्याची वेळ आली आहे. नमुना-ड घरकुल यादीचा सर्व्हे सोनोरी येथील तलाठी लाठेकर यांच्याकडे होता. त्यांनी सर्व्हे स्वतः न करता दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतल्याचा आरोप सरपंच राऊत यांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी अल्पसंख्याक लाभार्थींची नावे यादीत समाविष्ट करण्याची मागणी सरपंच अक्षय राऊत, उपसरपंच वंदना अनभोरे, सदस्या उमाताई हेंगड, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बोळे यांनी केली होती. अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता. या संदर्भात गटविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.