सर्वेक्षणामध्ये २४०० फेरीवाल्यांची नोंद; ३८७ जणांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:44 PM2020-03-07T12:44:01+5:302020-03-07T12:44:10+5:30
मनपाने संबंधित संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याने हॉकर्स झोनचा गुंता कायमच असल्याचे समोर आले आहे.
अकोला : शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ठाणे येथील सेवादल संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेने २ हजार ४०० फेरीवाल्यांची नोंद केली. त्यावर मनपाने आक्षेप-हरकती व सूचना बोलावल्या असता ३८७ व्यावसायिकांनी आक्षेप घेतला. मनपाने संबंधित संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिल्याने हॉकर्स झोनचा गुंता कायमच असल्याचे समोर आले आहे.
शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केले आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विके्रता तसेच विविध साहित्याची विक्री करणाºया लघुव्यावसायीक, फेरीवाल्यांनी रस्त्यांवरच दुकाने थाटली आहेत. शहरातील मोठी प्रतिष्ठाने, दुकानांसमोर लघुव्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. अतिक्रमणाचे लोण गल्लीबोळात पसरल्याची परिस्थिती आहे. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमकांना वारंवार हुसकावून लावल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या अतिक्रमकांकडून फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या सर्व बाबी ध्यानात घेऊन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरात विशिष्ट भागात ‘हॉकर्स व नो हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच फेरीवाल्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ठाणे येथील सेवादल नामक संस्थेला फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा कंत्राट दिला. संबंधित संस्थेने शहरातील २ हजार ४०० लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांची संख्या निश्चित के ली. यादी प्रसिद्ध झाल्यावर मनपाने हरकती, आक्षेप बोलावले असता ३८७ लघुव्यावसायीकांनी आक्षेप नोंदवत त्यांचे नाव समाविष्ट झाले नसल्याचे नमूद केले. ही बाब लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी प्राधिकृत केलेल्या समितीमधील अधिकारी, फेरीवाला संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून संस्थेला पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.
हॉकर्स झोन निश्चित केले; पण...
महापालिका प्रशासनाने फेरीवाले, लघुव्यावसायीकांना पर्यायी व्यवस्था म्हणून २१ ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ व ३१ जागा ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केल्या. तशी यादी तयार करण्यात येऊन फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून जागांचे वाटप करण्यात आले होते. तसेच मनपाच्या सभागृहात रीतसर ठरावही घेण्यात आला. या जागांकडे लघुव्यावसायिकांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
रस्त्यावर दुकाने; चालायचे कसे?
शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी रोड चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक , धिंग्रा चौकाचा समावेश असून, आयुक्त साहेब याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न अकोलेकर उपस्थित करीत आहेत.