तीन तालुक्यांतील नुकसानाचे सर्वेक्षण सुरू!
By admin | Published: March 18, 2017 02:49 AM2017-03-18T02:49:38+5:302017-03-18T02:49:38+5:30
अवकाळी पाऊस; अहवाल सादर करण्याचा जिल्हाधिका-यांचा आदेश.
अकोला, दि. १७- अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यातील बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यात झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण शुक्रवारपासून सुरू करण्यात आले असून, नुकसानाचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला.
जिल्ह्यात गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. प्राथमिक अहवालानुसार बाश्रीटाकळी तालुक्यात १८ गावांमध्ये आणि पातूर तालुक्यातील १६ गावांमध्ये पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यात गहू, हरभरा, कांदा, संत्रा व आंबा इत्यादी पिकांसह काही घरांचे नुकसान झाले असून, बाश्रीटाकळी व बाळापूर तालुक्यात पिकांच्या नुकसानासह काही घरांचे नुकसान झाले. या पृष्ठभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तीन तालुक्यांतील पीक नुकसानासह घरांच्या नुकसानाचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले. शेतातील पिकांचे नुकसान आणि घरांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर तहसीलदारांना दिला. त्यानुषंगाने अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागातील नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यात नुकसान झाले. नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण पूर्ण करून, नुकसानाचा अहवाल सादर करण्याचा आदेश तीनही तहसीलदारांना देण्यात आला.
- श्रीकांत देशपांडे
निवासी उपजिल्हाधिकारी