पाेलिसांच्या मारहाणीत संशयित आराेपीचा मृत्यू? ‘PSI’सह एक कर्मचारी निलंबित

By आशीष गावंडे | Published: April 15, 2024 08:45 PM2024-04-15T20:45:01+5:302024-04-15T20:45:21+5:30

अकोला : एका गुन्ह्यात संशयित आराेपी असलेल्या व्यक्तीला पाेलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

Suspected accused died in police beating? One employee with 'PSI' suspended | पाेलिसांच्या मारहाणीत संशयित आराेपीचा मृत्यू? ‘PSI’सह एक कर्मचारी निलंबित

पाेलिसांच्या मारहाणीत संशयित आराेपीचा मृत्यू? ‘PSI’सह एक कर्मचारी निलंबित

अकोला: एका गुन्ह्यात संशयित आराेपी असलेल्या व्यक्तीला पाेलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मृतकाच्या कुटुंबियांनी थेट अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर याप्रकरणी जिल्हा पाेलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सेवारत पाेलिस उपनिरीक्षक राजेश जावरे यांच्यासह साळुंके नामक कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. 

पाेलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गाेवर्धन हरमकार आहे. मृत गाेवर्धनचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिस ठाण्यातील पाेलिस उपनिरीक्षक राजेश जावरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी त्यांचा पुतण्या गोवर्धन याला अटक केली.

१६ जानेवारीला सुकळी गावातील त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना काही मिळालं नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतक गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव हरमकार यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री दोघांना पोलीस ठाण्यात आणून अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरही पोलिसांनी मृत गोवर्धनला मारहाण केली.

या मारहाणीत गाेवर्धनची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत अकाेट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गोवर्धनची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला उपचारासाठी अकोल्यात हलविण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिल्याने जखमी गाेवर्धनला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला गाेवर्धन हरमकार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाेलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच पुतण्याचा मृत्यू झाल्याचे सुखदेव हरमकार यांच्या तक्रारीत नमुद आहे. 


पाेलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नाेंद
गाेवर्धन हरमकार याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेता येइल,असं अकाेट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी ‘लाेकमत’शी बोलताना सांगितले.


गैरवर्तनाचा ठपका ठेवत निलंबन
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अकाेटचे उपविभागीय पाेलिस अधिकारी अनमाेल मित्तल यांनी सदर प्रकरणी चाैकशी करीत अहवाल तयार केला. हा अहवाल जिल्हा पाेलिस अधिक्षकांना सादर केल्यानंतर गैरवर्तनाचा ठपका ठेवत पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस उपनिरीक्षक राजेश जावरे यांच्यासह अंमलदार साळुंके यांना निलंबित केले आहे. 


अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात
वर्तमानस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेत सेवारत असलेले ‘पीएसआय’राजेश जावरे यांनी मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं? त्यादिवशी पोलिस ठाण्यात काय घडलं? याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यासाठी पाेलिस प्रशासन का टाळाटाळ करीत आहे?, कुटुंबियांच्या आरोपात सत्यता आहे का? शवविच्छेदन अहवालात काय नमुद आहे?, आणि सर्वात महत्वाचे मृतकाच्या कुटुंबियांनी सदर प्रकरणी तीन महिन्यांपर्यंत का चूप्पी साधली,आदी अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत.

 

Web Title: Suspected accused died in police beating? One employee with 'PSI' suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.