निलंबित चार कर्मचाऱ्यांची होणार विभागीय चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:13 PM2019-04-30T14:13:47+5:302019-04-30T14:13:53+5:30
अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार देण्याची तयारी प्रशासनाने चालवल्याची माहिती आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी निश्चिती करण्याची प्रक्रिया संबंधित विभागांना पूर्ण करावी लागते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विभाग वगळता पंचायत समित्यांमध्ये वेतन निश्चितीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील मिळून ४,५२६ प्रकरणे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित ३,६७८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये कर्मचारी वेतन निश्चितीसाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारीही मध्यंतरी झाल्या. त्यानंतर अकोल्यासह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये विशेषत: शिक्षकांना रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी झाल्या. त्याबाबतच्या पडताळणीत अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे ८४२ प्रकरणे प्रलंबित असल्याने कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये पंचायत समितीमध्ये कार्यरत संबंधित कर्मचारी पैसे उकळत असल्याचे पुढे आले. त्यामुळे अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चौघांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये पी. के. चंदेल, सय्यद रियाजोद्दीन, पी. एम. मोहोड व डी. ए. महल्ले यांचा समावेश आहे. या चौघांची विभागीय चौकशी करण्यासाठीचा प्रस्तावही तयार केला जात आहे. सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.