सशस्त्र दरोडा पूर्वनियोजित असल्याचा संशय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:26+5:302021-09-03T04:20:26+5:30
स्थानिक बुधवार वेस परिसरात राहणारे हार्डवेअरचे प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या निवासस्थानी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेदरम्यान ...
स्थानिक बुधवार वेस परिसरात राहणारे हार्डवेअरचे प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल यांच्या निवासस्थानी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेदरम्यान कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव करून घरावर दरोडा घातला. दरोडेखोरांनी घरात घुसखोरी केल्यानंतर मारहाण करीत हात बांधले. याप्रसंगी दरोडखोरांमध्ये महिलासुद्धा हाेत्या. त्यांनी इंदु बहन या वयोवृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, चेन, कानातले हिसकावले नाहीत. हात बांधताना सोन्याच्या बांगड्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय घरातील चांदीचे साहित्यही लंपास केले नाही. महागड्या टॅबलासुद्धा हात लावला नाही. केवळ २ हजार ७०० रुपये रोख रक्कम व एक मोबाईल घेऊन पसार झाले. दरोडेखोरांनी घरात फक्त रोख रकमेचा शोध घेतला. परंतु त्यांना रोख मिळून न असल्याने, त्यांनी पोबारा केला. शिवाय दरोडेखोरांनी या परिसरातील कोणत्याही घरी कोरोना लसीकरणाची चौकशी केली नाही. थेट सेजपाल यांच्याच घराला टार्गेट करून हाणामारी केली. घरात घुसखोरी केल्याने सशस्त्र दरोडा पूर्वनियोजित असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
फोटो:
दरोडा घालण्यापूर्वी काढली माहिती
दरोडेखोरांनी दरोडा घालण्यापूर्वी सेजपाल कुटुंबात व घरात कोणकोण आहे. व्यवसाय व खरेदी-विक्री व्यवहारातून जमा होणारी रक्कम आदी माहिती घेतली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. पोलीस सर्वच स्तरांवर पडताळणी करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे. तपासात अजूनपर्यंत तरी सीसी कॅमेरा फुटेजव्यतिरिक्त कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नसल्याची माहिती आहे. परंतु लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणार असल्याचा विश्वास अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी व्यक्त केला आहे.