‘स्वाभिमानी’चा आघाडीला ४९ जागांचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:50 AM2019-09-14T10:50:50+5:302019-09-14T10:50:57+5:30
पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अनुकूल मतदारसंघाची निवड करून राज्यातील ४९ जागांची यादी आघाडीकडे सोपविली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: काँग्रेस महाआघाडीसोबत लोकसभा निवडणूक लढविलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभेसाठी ४९ जागांची यादी काँग्रेसकडे सोपविली असून, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसवर दबाव वाढविण्यासाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी राजू शेट्टी यांच्या पुढाकारात लहान पक्षांची बैठकही आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्वाभिमानीचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने पक्षातील एकजूट कायम ठेवत विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. पश्चिम महाराष्टÑाबाहेरही स्वाभिमानीचा प्रभाव वाढावा या हेतूने गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अनुकूल मतदारसंघाची निवड करून राज्यातील ४९ जागांची यादी आघाडीकडे सोपविली आहे. या यादीसंदर्भात अद्यापपावेतो आघाडीसोबत जागा वाटपाची कोणतीही बैठक झाली नसल्याने प्रत्यक्ष बैठकीत शेट्टी यांना किती जागा मिळतात, हे स्पष्टच होईल; मात्र सन्मानजनक जागा न दिल्यास वेगळा पर्याय निवडण्याचीही तयारी स्वाभिमानीने सुरू केली असल्याचीही माहिती आहे.
यादीमध्ये दिला प्राधान्यक्रम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आघाडीला दिलेल्या ४९ मतदारसंघाच्या यादीमध्ये अ,ब,क असा प्राधान्यक्रम दिला आहे. आघाडीमध्ये जागा वाटप करताना ‘अ’ वर्गवारीमधील जागांबाबत तडजोड न करण्याबाबत स्वाभिमानी आग्रही राहणार असल्याचीही माहिती आहे.
लहान पक्षांचा दबावगट तयार करणार
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रबळ आघाडी तयार व्हावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न असला तरी या आघाडीत सन्मानजनक जागा मिळविण्यासाठी लहान पक्षांचा दबावगट तयार करण्याच्याही हालचाली सुरू आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील शेकापच्या कार्यालयात शेट्टी यांच्या पुढाकारात या पक्षांची बैठक नियोजित केली आहे.
राज्यातील ४९ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांची यादी काँग्रेसकडे सोपविली आहे. अद्यापपावेतो चर्चेची बैठक झालेली नाही. आघाडीबाबत आम्ही आशावादी आहोत, जागा वाटपाच्या बैठकीत काय ठरते, त्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.
- रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.