‘स्वाभिमानी’ पावले पुन्हा एनडीएकडे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:20+5:302021-09-04T04:23:20+5:30
राजेश शेगाेकार अकाेला : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विराेधात राजू शेट्टी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अन् ...
राजेश शेगाेकार
अकाेला : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विराेधात राजू शेट्टी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका अन् आता राष्ट्रवादीने फिरवलेला शब्द पाहता ‘स्वाभिमानी’ पावले पुन्हा एनडीएकडे ? जाऊ शकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या काेट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी राष्ट्रवादीने ऐनवेळी नकार देत १२ आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची माहिती समाेर आल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते पुन्हा संभ्रमात पडले आहेत. गेल्या लाेकसभा निवडणुकीपासून राजू शेट्टी यांनी एनडीएसाेबत फारकत घेत काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसशी हातमिळवणी केली हाेती. काॅंग्रेस आघाडीने दिलेल्या जागेवर शेट्टी यांचा पराभव झाल्याने स्वाभिमानीचा वारू काहीसा थंडावला हाेता. कारखानदारांच्या विराेधात संघटनेचा पाया रचणारे शेट्टी राष्ट्रवादीसाेबत बसल्यामुळे संघटनेवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे शेट्टी यांनी पुन्हा आंदाेलनाची हाक देत आपली शेतकरी नेता ही प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याची राजकीय किंमत त्यांना माेजावी लागली, असे कार्यकर्ते बाेलत आहेत. दुसरीकडे भाजपासाेबत गेल्याने शेट्टींना खासदार सदाभाऊ खाेत यांना मंत्रीपद व रविकांत तुपकर यांना महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले हाेतेे. त्यामुळे राजकीय ताकदीसाठी शेट्टी पुन्हा एनडीएकडे झुकतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेबाबत स्वाभिमानीचे नेते मात्र अधिकृत बाेलण्यास तयार नाहीत.
एनडीएसाेबत शेट्टींचा फायदा
शेट्टी यांनी लाेकसभेसाठी काॅंग्रेस आघाडीकडे याच हातकणंगले व बुलडाणा या दाेन जागा मागितल्या हाेत्या. मात्र, त्यावेळी हातकणंगलेसाेबत सांगलीची जागा वेळेवर देण्यात आली हाेती. आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कायम राहिली, तर शेट्टी यांचा प्रभाव असलेल्या हातकणंगले व बुलडाणा या दाेन्ही लाेकसभा मतदारसंघातील जागा स्वाभिमानीला देता येणार नाहीत, या दाेन्ही जागांवर सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे भाजपासाेबत गेल्यास शेट्टींचा फायदा हाेऊ शकताे, असे गणित कार्यकर्ते मांडत आहेत.