वाडेगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बॅंंकेसह तीन दुकानात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:41+5:302020-12-17T04:43:41+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे मंगळवारी मध्यरात्री बुलडाणा अर्बंन बँकेसह तीन दुकानातून चोरट्यांनी दोन ग्रॅम सोने ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे मंगळवारी मध्यरात्री बुलडाणा अर्बंन बँकेसह तीन दुकानातून चोरट्यांनी दोन ग्रॅम सोने व ७०० ग्रॅम चांदीसह ऐवज लंपास केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाडेगाव-पातूर रोडवर असलेल्या बुलडाणा अर्बंन बँकेसह बसस्थानक परिसरातील लखाडे ज्वेलर्स, लक्ष्मी ज्वेलर्स, पूजा ट्रेडर्स येथे चोरी झाली आहे. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने गेट तोडून दुकानात प्रवेश करीत प्रथम सीसी कॅमेऱ्यांची तोडफोड करीत मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी खामखेड रस्त्यावरील एका शेतात साहित्य फेकून देत पळ काढला. सकाळी याठिकाणी चारचाकी (क्र. एमएच ०१ डीए ११६४) बेवारस स्थितीत आढळून आली आहे. या घटनेत बॅंकेतील साहित्य लंपास झाले नसून, केवळ तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती आहे. तसेच लखाडे ज्वेलर्समधून दोन ग्रॉम सोने व ७०० ग्राम चांदी चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस उपअधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. घटनेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांच्यासह वाडेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वासाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र आहेरकर, पोलीस कॉन्स्टेबल निखिल सूर्यवंशी, अमर पवार, विनायक पवार, गणेश गावंडे, जावळे करीत आहेत. अज्ञात चोरट्यांविरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच रात्री चार दुकाने फोडल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. (फोटो)