स्वाइन फ्लूचा पुन्हा धोका; जिल्ह्यात एक बळी, तर पाच पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:46 PM2019-02-19T13:46:49+5:302019-02-19T13:47:10+5:30
अकोला: गत दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात अकोल्यातील एक बळी गेला असून, पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
- प्रवीण खेते
अकोला: गत दीड महिन्याच्या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात अकोल्यातील एक बळी गेला असून, पाच रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. मागील १५ दिवसांत स्वाइन फ्लूच्या रुग्णाची नोंद झाली नसली, तरी आरोग्य विभागातर्फे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लूने पुन्हा अटॅक केला असून, दीड महिन्यातच जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे अकोला विभागात १० संशयित रुग्ण आढळून आले. त्यातील पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जानेवारी महिन्यात यातील एकाचा बळी गेला. अशातच गत दीड महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूचे १७ बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आढळल्याची माहिती आहे. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता शुक्रवार १५ फेब्रुवारी रोजी आरोग्य मंत्रालयातर्फे राज्यभरात पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचा आदेश दिला आहे. स्वाइन फ्लूचा धोका लक्षात घेता वेळीच सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे.
काय आहे पंचसूत्री कार्यक्रम?
स्वाइन फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे पंचसूत्री कार्यक्रम राबविण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, सर्वेक्षण, निदान, उपचार, लसीकरण आणि जनजागृती या बाबींचा समावेश आहे. या अंतर्गत विविध समुदायांच्या गटसभा आणि कार्यशाळा घेणे, शालेय स्तरावर जनजागृती मोहीम आदींची कृती योजना फेब्रुवारी महिन्यात अमलात आणण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत.
तीन हजारांवर रुग्णांचे स्क्रिनिंग
अकोला आरोग्य विभागांतर्गत गत महिन्यात तीन हजार ७४८ रुग्णांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. यामध्ये अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, अकोला शहर व अकोला ग्रामीण आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. यातील १० रुग्ण स्वाइन फ्लूचे संशयित असून, त्यामध्ये पाच रुग्ण अकोल्यातील, तर दोन रुग्ण अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक आणि हिंगोली जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
लक्षणे
ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब
ही घ्या सतर्कता
स्वच्छता राखा
गर्दीमध्ये जाणे टाळा
हस्तांदोलन टाळा
सार्वजनिक ठिकणी थुंकणे टाळा
स्वाइन फ्लूचा धोका लक्षात घेता वेळीच सतर्कता घेण्याची गरज. वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार पंचसूत्री कार्यक्रमासंदर्भात निर्देश दिले आहेत.
- डॉ. फारुकी, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला