रेल्वेस्थानक, बसस्थानकावर स्वाइन फ्लूची नागरिकांत धास्ती
By Admin | Published: April 15, 2017 01:29 PM2017-04-15T13:29:53+5:302017-04-15T13:29:53+5:30
काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्हय़ाच्या आणि जिल्हय़ाबाहेरून येणार्या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
अकोला: स्वाइन फ्लूची लागण झाल्याने अकोल्यातील दोघांचा बळी गेल्याने आणि काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्हय़ाच्या आणि जिल्हय़ाबाहेरून येणार्या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
अकोला रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरील गर्दीत प्रवासी नाकाला रूमाल बांधलेल्या स्थितीत फिरताना आढळतात. विचारणा केली असता, याबाबत काहींनी स्वाइन फ्लूची धास्ती बोलून दाखविली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा समावेश जास्त दिसून आला. एकीकडे प्रवाशांमध्ये स्वाइन फ्लूच्या लागणची भीती आणि नागरिकांत दहशत जाणवत असली तरी आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, रेल्वेस्थानक, बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली गेलेली नाही. अमरावती आणि इतर ठिकाणाहून अकोल्यात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊन दोघे दगावले. काही संशयित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा अधिकृत आरोग्य अहवाल आलेला नसल्याने त्यांना स्वाइन फ्लूचे रुग्ण म्हणता येणार नाही. महापालिकेने स्वच्छतेबाबत नीगा राखण्याचे निर्देश दिले; मात्र त्या पलीकडे काहीही केलेले नाही. जिल्हा सवरेपचार विभागानेदेखील अजूनही पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. सामाजिक संस्थादेखील अजून पुढे आलेल्या नाहीत. योग्यवेळी आळा घातला गेला तर ही समस्या लवकरच आटोक्यात येऊ शकते. अन्यथा हाताबाहेर गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणाहून स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.