स्वाइन फ्लूचे निदान आता अकोल्यातच; ‘जीएमसी’मध्ये होणार प्रयोगशाळा
By atul.jaiswal | Published: October 6, 2018 12:31 PM2018-10-06T12:31:32+5:302018-10-06T12:33:42+5:30
अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे.
अकोला: राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश आहे. ही प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यानंतर अकोल्यातच स्वाइन फ्लू व इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य होणार आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य, कुटुंब व कल्याण विभागांतर्गत १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे निर्माण करण्याची योजना आहे. त्यानुसार अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा होणार आहे. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत या प्रयोगशाळेचे कामकाज चालणार आहे. महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेसाठी पाच वर्षानंतर येणाºया आवर्ती खर्चाच्या दायित्वासही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी राज्य शासनातर्फे सामंजस्य करार करण्यास वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांना अधिकार देण्यात आले आहेत.
विषाणूंबाबत होणार संशोधन
या प्रयोगशळेत विषाणूजन्य आजारांचे निदान तर होईलच, शिवाय इतर बाबींचाही अभ्यास करण्यात येणार आहे. साथ पसरविणाºया विषाणूंचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, आजार निदान संच तयार करणे, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाºयांना प्रशिक्षण देण्याशिवाय विषाणूंबाबत संशोधन आणि अभ्यास करणे, हा या प्रयोगशाळेचा उद्देश असल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
दीड वर्षांपूर्वीच पाठविला होता प्रस्ताव
अकोला व परिसरात विषाणूजन्य आजारांच्या निदानाची सुविधा नसल्याने नमुने नागपूर किंवा मुंबई येथे पाठवावे लागत होते. अहवाल मिळण्यासाठी विलंब होत असे. त्यामुळे अकोल्यात ही प्रयोगशाळा व्हावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दीड वर्षांपूर्वीच प्रस्ताव पाठविला होता.
आता लवकर मिळणार अहवाल
पूर्वी स्वाइन फ्लू किंवा इतर विषाणूजन्य आजारांचे निदान करावयाच्या असल्यास शासकीय व खासगी इस्पितळांना नागपूर किंवा मुंबई येथील प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत असे. नमुने पाठविल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यासाठ विलंब व्हायचा. आता अकोल्यातच प्रयोगशाळा होणार असल्यामुळे वेळेवर निदान होऊन लवकर उपचार करता येतील.
राज्य शासनाकडून हिरवी झेंडी मिळाल्यानंतर ही प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होणार आहे. आजारांचे निदान तातडीने होऊन, विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी ही प्रयोगशाळा लाभदायक ठरणार आहे. -डॉ. राजेश कार्यकर्ते