स्वाइन फ्लूने मृत्युचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:13 AM2019-11-26T11:13:18+5:302019-11-26T11:13:18+5:30
गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता.
अकोला : राज्यात गत दोन ते तीन वर्षांत स्वाइन फ्लूची प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे मागील पाच वर्षांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गत वर्षभरात स्वाइन फ्लूचे दोन हजार २७१ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी २४० रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर २०१८ मध्ये स्वाइन फ्लूच्या दोन हजार ५९४ रुग्णांपैकी ४६२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गत दोन वर्षांत लोकांमध्ये केलेली जनजागृती आणि लसीकरण मोहिमेतून सामूहिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाल्याने स्वाइन फ्लूचे प्रमाण घटल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या हजारोंवर पोहोचली आहे. दोन वर्षांपासून यातील मृतांचे प्रमाणही लक्षणीय होतं; मात्र मागील पाच वर्षांत स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभरात स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाºया रुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. आरोग्य विभागामार्फत लसीकरण आणि लोकांमध्ये निर्माण झालेली सामूहिक प्रतिकारकशक्ती यामुळे स्वाइन फ्लूचे प्रमाण घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. २०१८ मध्ये पावसाळा आणि हिवाळ््यातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची लक्षणीय संख्या होती; मात्र दरम्यानच्या काळात करण्यात आलेली जनजागृती तसेच लोकांमध्ये वाढलेल्या प्रतिकारकशक्तीमुळे मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पाच वर्षातील स्वाइन फ्लूची स्थिती
वर्ष रुग्ण मृत्यू
२०१५ ८५८३ ९०५
२०१६ ८२ २६
२०१७ ६१४४ ७७८
२०१८ २५९४ ४६२
२०१९ २२७१ २४०
स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप
घसा खवखवणे
अंगदुखी
थकवा
अतिसार, उलटी
अचानक तोल जाणे
श्वसनाचा त्रास
मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे
अशी करा प्रतिबंधात्मक उपाय योजना
सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करा
मास्कचा वापर करावा
हात वारंवार साबणाने धुवा
भरपूर पाणी प्या
संतुलित आहार घ्या
स्वाइन फ्लूच्या लढ्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती व लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिवाय नागरिकांनी रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी संतुलीत आहार व नियमित व्यायाम केल्यास ही स्थिती आणखी सुधारेल.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.