पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 06:06 PM2021-01-11T18:06:57+5:302021-01-11T18:30:40+5:30
Petrol-diesel price hike पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
अकोला : पेट्रोल व डिझेलचे दर ९० रुपयांवर पोहोचले असून वाहनधारक या दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. शिवाय पेट्रोल व डिझेलवर अनेक प्रकारचे व्यवसाय अवलंबून आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, माजी नगरसेवक पंकज गावंडे, महानगर अध्यक्ष करण दोड यांच्या नेतृत्वात स्थानिक बसस्थानक चौकात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून दुचाकीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ही दरवाढ अशीच कायम राहिली तर पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ किंवा घोडेस्वारी करण्याची वेळ येऊ शकते या बाबीचे प्रतीक म्हणून आंदोलनात बैलगाडीवर दुचाकी बांधण्यात आली व घोडस्वार आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात जोरदार नारेबाजी करून या वेळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे वाहनधारकांना थोडा त्रास झाला, तरीही त्यांच्याकडून व सामान्य नागरिकांकडून या आंदोलनाचे व मागणीचे समर्थन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे महानगर अध्यक्ष मिलिंद गवई, माजी नगरसेवक फजलू पहेलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे, राम म्हैसणे, चैतन्य लाखे यांच्यासह हर्षल ठाकरे, ताज राणा, श्रीकांत साबळे, पवन सावरकर, शीलवंत खंडारे, शिव ठाकरे, प्रणव तायडे पाटील, कुंदन धुरंदर, बाळासाहेब तायडे, अभिषेक खंडारे, हर्षद खडसे, वैभव मानकर, प्रशांत थोरात, अजिंक्य टेपरे, संतोष इंगळे, अफीफ कुरेशी, मोहम्मद अदनान, इजहार अहमद, साहिल अहमद, मोहन शेळके आदी सहभागी झाले हाेते.