पीकविमा फरकाच्या रकमेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:28+5:302021-01-03T04:19:28+5:30
अकोला : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०१९ मध्ये ऑनलाइन पीकविमा काढलेल्या अकोला तालुक्यातील काैलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या ...
अकोला : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०१९ मध्ये ऑनलाइन पीकविमा काढलेल्या अकोला तालुक्यातील काैलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांना मंजूर पीकविम्याच्या रकमेपैकी फरकाची रक्कम अद्यापही मिळाली नाही, त्यामुळे पीकविमा फरकाच्या रकमेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवदेनाद्वारे केली.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०१९ मधील खरीप हंगामात अकोला तालुक्यातील काैलखेड जहाँगीर येथील शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकविमा काढला व विमा हप्त्याची रक्कम जमा केली; मात्र विमा काढलेल्या २७७ शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ॲग्रीकल्चर इश्युरन्स कंपनीकडून मंजूर करण्यात आली, त्यापैकी विमा रकमेचा अंशत: लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला; मात्र पीकविमा रकमेच्या फरकाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. विमा कंपनीकडून पीकविमा रकमेच्या फरकाची ९६ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप अदा करण्यात आली नाही, त्यामुळे यासंदर्भात चाैकशी करून पीकविमा रकमेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवदेनाद्वारे केली. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, डाॅ. शंकरराव वाकोडे, माधव मानकर, गिरीश जोशी, मनिराम ताले, अंबादास उमाळे, गणेश तायडे, जयंत मसने, गोपाल मुळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.