‘लिंकिंग’ करून खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:18+5:302021-04-27T04:19:18+5:30
अकोला : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या विक्रीत ‘लिंकिंग’ करून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अनावश्यक खतेही खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे ...
अकोला : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या विक्रीत ‘लिंकिंग’ करून विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अनावश्यक खतेही खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे जिल्ह्यात ‘लिंकिंग’ करून खतांची विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित खत विक्रेत्यांविरुद्ध जीवनाश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकांतअप्पा खोत, सहा. व्यवस्थापक (पणन ) सचिन कातखेडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक जगदिशसिंह खोकड, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे, जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्रभाकर मानकर, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे आदी उपस्थित होते.
खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना अनावश्यक खत खरेदी करावयास सांगू नये. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागतो, सोबतच अनावश्यक खतांचा वापर केल्यास जमिनीचे आरोग्यही बिघडते. त्यामुळे विक्रेत्यांनी खतांची विक्री करताना ‘लिंकिंग’ करू नये. खते विक्रेत्यांनी खतांची विक्री करताना लिंकिंग करू नये. ‘लिंकिंग’ करून बळजबरीने अनावश्यक खत खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित विक्रेत्याची शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
जुन्या दरातील उपलब्ध खत
साठ्याची विक्री जुन्या दरानेच करा!
जिल्ह्यात सध्या जो खतांचा साठा उपलब्ध आहे, तो जुन्या दरातील खतांचा साठा आहे. त्यामुळे उपलब्ध खतसाठ्याची विक्रीसुद्धा जुन्या दरानेच झाली पाहिजे, याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांनी जुन्या दराने खते खरेदी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बियाणे, खतांची टंचाई भासू नये!
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासू नये, यासाठी बियाणे व खतांची उपलब्धता वेळेवर आणि किफायतशीर दरात व्हावी, याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष असावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
.........................फोटो...........