आरोग्य सेवेच्या कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:48+5:302021-01-23T04:18:48+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, अन्यथा ...
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, अन्यथा कारवाईला सामाेरे जावे लागेल, असा इशारा सभेत देण्यात आला. दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याच्या मुद्दयावर समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानुषंगाने दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या, तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, प्रमोदिनी कोल्हे, गोपाळराव भटकर, डाॅ.गणेश बोबडे, अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेश आसोले उपस्थित होते.
आरोग्य सेवेच्या मुद्दयावर
सदस्यांची तीव्र नाराजी!
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे या मुद्दयावर आरोग्य समितीच्या सदस्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.