रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घ्या ! जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 04:26 PM2023-06-11T16:26:16+5:302023-06-11T16:41:16+5:30
या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक समस्या तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमित घेण्यात याव्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सभेत दिले.
संतोष येलकर / अकोला
अकोला: जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घेण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.जिल्हयातील ग्रामीण भागात आरोग्यविषयक समस्या आणि रुग्णांच्या अडचणी निकाली काढण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरांवर रुग्णकल्याण समित्या गठित करण्यात आल्या असल्या तरी, या रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमीत घेण्यात येत नसल्याच्या मुद्दयावर सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक समस्या तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील रुग्णकल्याण समित्यांच्या सभा नियमित घेण्यात याव्या, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सभेत दिले. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीच्या सदस्य पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रमोदिनी कोल्हे, प्रगती दांदळे आदींसह जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करा !
पावसाळ्यात जिल्हयातील ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबतची खबरदारी घेवून, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष तथा आरोग्य सभापती संगीता अढाऊ यांनी या सभेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला दिल्या.