आमचे रक्त घ्या, पण आम्हाला शिकवू द्या ; शिक्षकांची भावनिक हाक
By रवी दामोदर | Published: September 9, 2023 07:38 PM2023-09-09T19:38:09+5:302023-09-09T19:38:18+5:30
पातूर येथे पार पडले रक्तदान शिबिर
अकोला : शासनाच्या अनेक अशैक्षणिक कामांचा ताण म्हणून त्रस्त शिक्षकांनी ‘आमचे रक्त घ्या, पण आम्हाला शिकवू द्या’ अशी भावनीक हाक देत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. पातूर येथील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित शिबिरात रक्तदान केले. शिक्षकांनी यापूर्वी यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र दिले होते.
शिक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार, शासनाच्या अशैक्षणिक कामांच्या अतिरिक्त बोझ्यामुळे विद्यार्थ्यांचे नकळत प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागे लादलेले अशैक्षणिक कामे काढून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करू द्यावे, अशी मागणी याप्रसंगी शिक्षकांनी केली आहे. प्रशासनाकडे भावनिक साद घालण्याकरिता शिक्षकांनी ‘आमचे रक्त घ्या, पण आम्हाला शिकवू द्या’ अशी हाक देत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. याप्रसंगी पातूर पंचायत समितीच्या सभापती सुनीता अर्जुन टप्पे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी सुद्धा रक्तदान शिबिराला भेट दिली. सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येईल, असे शिक्षकांनी सांगितले.