आधी बाजोरिया मैदानाची जागा ताब्यात घ्या,नंतर निविदा राबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:18+5:302021-04-20T04:19:18+5:30
अकोला: शहरातील जनता भाजी बाजार तसेच जुन्या बस स्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यासह गांधी जवाहर बगिच्यालगत असणाऱ्या बाजोरिया मैदानात ...
अकोला: शहरातील जनता भाजी बाजार तसेच जुन्या बस स्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यासह गांधी जवाहर बगिच्यालगत असणाऱ्या बाजोरिया मैदानात प्रेक्षागृह उभारण्याचा मनपाचा प्रस्ताव होता. या प्रस्तावातून मनपा प्रशासनाने बाजोरिया मैदानाला का वगळले, असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी बाजोरिया मैदानाची जागा ताब्यात घेतल्यानंतरच जनता भाजी बाजारसाठी वाणिज्य संकुलाची निविदा राबविण्याची सूचना मनपा आयुक्त निमा अरोरा यांना पत्राद्वारे सोमवारी केली.
मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी शहरातील निवडक आरक्षित जागांवर वाणिज्य संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये जनता भाजी बाजार, जुने बस स्थानकाची जागा व गांधी जवाहर बागेलगतच्या मैदानाचा समावेश आहे. या तीन जागेचा विकास करण्याच्या उद्देशातून मनपाने रितसर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता.
माशी कुठे शिंकली?
सदर तीनही जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात मनपाला जिल्हा प्रशासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावे लागणार होते. नंतर कोठे माशी शिंकली देव जाने, मनपाने जनता भाजी बाजार व जुने बस स्थानकाच्या जागेसाठी २६ कोटी रुपये शुल्क जमा केले. त्यातून बाजोरिया मैदानाची जागा का वगळण्यात आली, याबद्दल मनपाने चुप्पी साधने पसंत केले आहे.
शिवसेनेची उडी!
आरक्षण असलेल्या बाजोरिया मैदानाच्या जागेविषयी शासनाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीला मनपाने राज्य शासनाकडे आव्हान दिले का, असा सवाल उपस्थित करीत भाजी बाजारातील व्यावसायिकांची बाजू ऐकून न घेता मनपाने दुकाने हटविण्यासाठी सुरू केलेल्या हालचाली संशयास्पद ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत या विषयात शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी उडी घेतली आहे.
जुने बस स्थानक
आरक्षण क्रमांक १०३,वाणिज्य संकुल व सिटी बसस्थानक
एकूण क्षेत्रफळ- १ लक्ष ४ हजार ७५ चौरस फूट
जमा झालेली रक्कम- ७ कोटी ३९ लक्ष ९३ हजार
जनता भाजी बाजार
आरक्षण क्रमांक २०३, वाणिज्य संकुल व भाजी बाजार
एकूण क्षेत्रफळ- २.४७ हेक्टर आर
जमा झालेली रक्कम- १८ कोटी ८० लक्ष ३५ हजार
ऑडिटोरिअम (प्रेक्षागृह)
आरक्षण क्रमांक १९८, ऑडिटोरिअमची उभारणी
जमा होणारी रक्कम- ३ कोटी ७ लक्ष २ हजार