कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:23 AM2021-06-09T04:23:45+5:302021-06-09T04:23:45+5:30
अकोला : कोरोना विषाणूची तिसरी संभाव्य लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात ...
अकोला : कोरोना विषाणूची तिसरी संभाव्य लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात उपचार सुविधा, ऑक्सिजन उपलब्धता, लसीकरण यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दिले.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्वतयारी संदर्भात ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. या ऑनलाइन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. वरठे तसेच तालुका आरोग्य अधिकारी, आदी सहभागी झाले होते.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व कोविड केअर सेंटर्स सुसज्ज करून बालकांसाठी प्रत्येक तालुक्यात बेड राखीव ठेवावे, आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध राहील याकरिता नियोजन करावे. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटची कामे पूर्ण झाली असल्याची खातरजमा करावी. तसेच औषधांची उपलब्धता, सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिका, आदी सोयी-सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त गाव मोहीम राबवून कोरोनामुक्त गावांना बक्षिसे देण्याचे निर्देशही पालकमंत्री कडू यांनी ऑनलाईन बैठकीत दिले.