अक्षय भालेराव हत्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करा; भीम सैनिक संघटनेची मागणी
By संतोष येलकर | Published: June 14, 2023 05:14 PM2023-06-14T17:14:57+5:302023-06-14T17:16:45+5:30
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
अकोला: नांदेड जिल्ह्यात बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाची गावगुंडांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाइ करुन मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करीत भीम सैनिक संघटना अकोला शाखेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, कुटुंबियांना शस्त्रधारी सुरक्षा प्रदान करण्यात यावी, हत्या प्रकरण जलद गती न्यायालयाकडे सुपूर्द करुन प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे व या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी भीम सैनिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात भीम सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाइ सावळे, शंकर कंकाळ, रामदास अहिर, भाऊराव वानखडे, सुरेश वानखडे, गौतम सावळे, चंद्रभान मोरे, आकाश वानखडे, अमन घरडे, डाॅ.रेखा घरडे, भीमराव वानखडे, कैलास वानखडे, निखिल दामोदर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.