पूर्णेचे पवित्र जल घेऊन कावड, पालख्या अकोल्यात दाखल
By Atul.jaiswal | Published: August 22, 2022 10:25 AM2022-08-22T10:25:51+5:302022-08-22T10:30:32+5:30
Kawad-Palkhi Mahotswa : अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पुर्णा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करण्याची अकोलेकरांची गत अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार रविवारी रात्री गांधीग्राम येथून पाणी घेऊन रवाना झालेल्या कावड व पालखी सोमवारी सकाळी अकोला शहरात दाखल झाल्या. अकोट फैल भागात दाखल झालेल्या कावड व पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे.
गत दोन वर्षे कोरोनामुळे कावड व पालखी उत्सव कोणताही गाजावाजा आणी गर्दी न होऊ देता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरानाचे निर्बंध उठल्यामुळे मोठ्या उत्साहात व जल्लोषात कावड-पालखी उत्सव साजरा केल्या जात आहे. शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांचे कार्यकर्ते भरण्यांची कावड तयार करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर जल आणण्यासाठी रविवारी दुपारीच रवाना झाले होते. रविवारी रात्रभर गांधीग्राम येथून मजल दरमजल करत कावड व पालख्या घेऊन शिवभक्त सोमवारी पहाटे अकोल्यात दाखल झाले. . कावड यात्रेमुळे शिवभक्त उत्साहित झाले असून, कावडीसह पालखीवर वेगवेगळे व आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.
अकोल्यातील कावड यात्रा ही महाराष्ट्रातील एकमेव आणि ७७ वर्षांची परंपरा असलेली कावड यात्रा आहे. या कावड यात्रेच्या दृष्टिकोनातून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्था, संघटना स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौक व कावड मार्गाला भगव्या पताकांसह स्वागत कमानींनी सजविण्यात आले आहे. दाखल झालेल्या कावड व पालख्यांच्या ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. दुपारपर्यंत मानाची पालखी राजराजेश्वराला जलाभिषेक करणार आहे.