तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन!
By admin | Published: July 15, 2017 02:03 AM2017-07-15T02:03:53+5:302017-07-15T02:03:53+5:30
तलाठ्याविरुद्धची कारवाई मागे घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला तहसील कार्यालय अंतर्गत एका तलाठ्याविरुद्ध करण्यात आलेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी व अव्वल कारकून कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत लेखनीबंद आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्यावतीने मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
अकोला तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी नंदकिशोर माहोरे यांच्याविरुद्ध करण्यात आलेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्यात यावी, यासाठी विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकून यांनी बेमुदत लेखनीबंद आंदोलन सुरू केले आहे.
मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना सादर करण्यात आले.
यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेचे नीळकंठ नेमाडे, शशिकांत शिंदे, संदीप बोळे, संजय तळोकार, हरिहर निमकंडे, भगवान थिटे, दीपक देशमुख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.