लाच स्वीकारताना तलाठी जेरबंद
By Admin | Published: February 14, 2017 01:48 AM2017-02-14T01:48:27+5:302017-02-14T01:48:27+5:30
आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठय़ाला रंगेहात पकडले.
वाशिम, दि. १३- शेती वाटणीची नोंद घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ फेब्रुवारी रोजी तलाठय़ाला त्याच्या राहत्या घरी रंगेहात पकडले. दीपक वसंतराव लहाने (४0) असे तलाठय़ाचे नाव असून, तो रिसोड तालुक्यातील आसेगावपेन येथे कार्यरत आहे.
यासंदर्भात फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार व त्याच्या भावात शेतीची वाटणी झाली. शेती वाटणीची नोंद घेण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आसेगावपेन येथील तलाठी दीपक लहाने यांना तक्रारदार भेटले असता, नोंद घेण्यासाठी तलाठय़ाने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावेळी तलाठय़ाला सहा हजार रुपये दिले होते. दरम्यानचे काळात तलाठी लहाने यांच्याशी तक्रारदार यांनी प्रत्यक्ष फोनद्वारे संपर्क साधून नोंदीबाबत पाठपुरावा केला. परंतु लहाने याने नोंद घेतली नाही. २२ जानेवारी २0१७ रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता नोंदी घेण्यासाठी उर्वरित ९ हजार रुपये द्यावे लागतील, असे तलाठय़ाने म्हटले. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. लहाने याने एकरी साडेतीन हजार रुपये याप्रमाणे तीन एकराचे साडेदहा हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्या-घेण्याचे ठरले. त्यानंतर लहाने यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांचे दत्तनगर लाखाळा वाशिम येथील राहते घरी पैसे देण्याचे ठरले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान दीपक लहाने (रा.तिवळी ता.मालेगाव) ह.मु. दत्तनगर वाशिम यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून स्वीकारलेली लाचेची रक्कम आठ हजार रुपये जप्त करण्यात आली. सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधिक्षक विलास देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांच्या पथकाने केली.