शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

By admin | Published: December 6, 2014 12:51 AM2014-12-06T00:51:31+5:302014-12-06T00:51:31+5:30

आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद: आत्महत्यांची दाहकता व्यथित करून गेली.

Talk to the pain of farmers | शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

शेतक-यांच्या वेदनांना बोलतं करावं

Next

अकोला: शेती केवळ व्यवसाय नाही, तर ती जीवनपद्धती आहे. माती, बी-बियाणे, खते यासह तंत्रज्ञानावर लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र केवळ तंत्रज्ञानाने शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. कारण युरोप खंडातील प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानादेखील तेथेही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची एक मानवी प्रश्न म्हणून संवेदनशीलतेने उकल करण्याची गरज कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी संवादातील शुक्रवार रोजी झालेल्या तिसर्‍या परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केली.
या परिसंवादात ह्यसमस्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी सामाजिक साखळीह्ण या विषयावर कोलिन आणि मोनिका हॉवर्थ, इंग्लंड येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याने त्यांचे अनुभव मांडले. शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न केवळ भारतात नसून, जगभरात भेडसावत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले. आर्थिक विवंचनेतून त्यांच्या ३२ वर्षीय मुलाने १२ वर्षांपूवी आत्महत्या केली असल्याचे सांगितले. मुलाच्या आत्महत्येची वेदना आणि जखमा आजही ओल्याच आहेत; मात्र त्या वेदना परिस्थितीशी झगडण्याचे बळ देऊन गेल्याचे त्या म्हणाल्या. आज शेतकर्‍यांना बळ आणि मानसिक आधार देणारी संस्था त्या चालवित असल्याचे त्यांनी सांगितले.
आज जीवनाची गणिते अर्थकेंद्रित झाली असल्याचे सांगून त्यांनी एका शेतकरी आत्महत्येमुळे होणार्‍या हानीचे गणित मांडले. त्यांच्या आकलनानुसार एका आत्महत्येमुळे कुटुंबाचे, राज्याचे पर्यायाने देशाचे १४ कोटी रुपये नुकसान होत असल्याचा त्यांनी अंदाज मांडला. त्यासोबत कुटुंबीयांना होणार्‍या वेदना, मित्र आणि सहकार्‍यांच्या होणारी पीडा शब्दातीत असतात.
आत्महत्या करणार्‍या दर चारपैकी एका व्यक्तीस गंभीर मानसिक विकार असून, इंग्लंडमध्ये होणार्‍या आत्महत्येमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथील सरकारने शेतीचा सर्वात धोकादायक व्यवसायात समावेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले. इंग्लंडमध्ये आत्महत्या हा गुन्हा नाही. त्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची अवहेलना होत नसल्याचे त्या म्हणाल्या.
वेदनेची पीडा जाणवल्याशिवाय त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा मार्गदेखील मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची वेदना जाणावी जेणेकरून त्यांच्या समस्येचे खरे आणि दुरगामी निदान शक्य होऊ शकेल, असे परिसंवादाचे अध्यक्ष क्लाऊड बॉडीन यांनी स्पष्ट केले. डॉ. एस. एस. वंजारी, मुस्ताफिना फेरुझा व इनिशिएटिव्ह फॉर चेंज संस्थेचे अभय शाह यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिसंवादात डॉ. संजय भोयर, युगांडा येथील प्रगतिशील शेतकरी फरिदा किकोमेको, सुनंदा सलोदकर आणि ललित बहाले यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Talk to the pain of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.