आक्षेपार्ह फोटोवरून तेल्हा-यात तणाव
By admin | Published: March 7, 2017 02:29 AM2017-03-07T02:29:54+5:302017-03-07T02:29:54+5:30
युवकांनी जाळला पोलीस खात्याचा प्रतीकात्मक पुतळा.
तेल्हारा (अकोला), दि. ६- महामानवांच्या चलचित्राचे आक्षेपार्ह संदेश फेसबुकवर टाकल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यासाठी काही युवक तेल्हारा पोलिसात ६ मार्च रोजी गेले होते. पोलिसांनी सदर प्रकरणी अमरावती पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यावरून युवकांनी टॉवर चौकात येऊन पोलीस खात्याच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन केल्याने, काही काळ तणाव निर्माण झाला होता.
महामानवाच्या चलचित्राचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी वाडी अदमपूर येथील आकाश तेजराव सरदार याने तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली होती. याबाबत काय कारवाई केली, याविषयी युवकांनी विचारणा केली. त्यावर तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणी अमरावती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली. त्यामुळे, ६ मार्च रोजी काही युवकांनी टॉवर चौकात एकत्र येऊन, त्या घटनेचा निषेध केला. तसेच तेल्हारा पोलिसांच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन केले. त्यामुळे, शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे, अकोटचे ठाणेदार इंगळे, हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे आदींनी आक्षेपार्ह संदेशाचा शोध घेतला. यावेळी तेल्हार्याचे प्रभारी ठाणेदार शरद भस्मे उपस्थित होते.