‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी होणार तालुकानिहाय कार्यशाळा
By admin | Published: April 12, 2017 09:44 PM2017-04-12T21:44:34+5:302017-04-12T21:44:34+5:30
अकोला विक्रीकर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोहीम
अकोला : ‘जीएसटी’ विद्येयकास मंजुरी मिळाली असून, आगामी जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी लागू होत आहे. जीएसटी म्हणजे काय, त्याची आवश्यकता कशासाठी आहे, याबाबत जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. अकोला विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यासंदर्भात निर्देश देण्यात आले असून, अकोलासह पातूर, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोट आणि तेल्हारा येथे टप्प्याटप्प्याने जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. तालुक्यातील नोंदणीकृत करदाते आणि उद्योजकांना कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘जीएसटी’च्या अंमलबजावणीसाठी अकोला येथील विक्रीकर कार्यालयात तात्पुरती नोंदणी सुरू झाली असून चेन्नई, मुंबई आणि अमरावती येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्वायत्ततेचा प्रश्न परिषदेने निकाली काढल्यानंतर आता जीएसटी लागू करण्याची मोहीम देशभरात जोरात सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील विक्रीकर कार्यालयात ‘जीएसटी’ची तात्पुरती नोंदणी सुरू झाली आहे. राज्य आणि केंद्राची चमू यासाठी कामाला लागली आहे. दिल्लीपासून तर लहान-लहान जिल्ह्यापर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. व्हॅट भरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आता ‘जीएसटी’ची तात्पुरती नोंदणी करून घेतली जात आहे. अकोल्यात असलेल्या व्यापाऱ्यांनादेखील नोंदणी करण्याचे आणि मागील व्हॅटचा भरणा करण्याचे आवाहन केले आहे. अकोल्यात सात हजार डिलर असून, त्यांना तात्पुरती नोंदणी करण्याचे सुचविण्यात आले असून, अनेकांनी त्याचा लाभही घेतला आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी आणि ‘जीएसटी’च्या जनजागृतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर कार्यक्रम घेतले जात आहेत. तालुक्याच्या या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ लवकरच होणार असून, विक्रीकर अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.
जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. त्यानुसार विक्रीकर विभागाच्यावतीने आम्ही कार्यक्रम आखला आहे. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी कार्यशाळेतून त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे.
- सुरेश शेंडगे, आयुक्त, विक्रीकर विभाग, अकोला.