वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार
By Atul.jaiswal | Published: August 25, 2021 10:42 AM2021-08-25T10:42:00+5:302021-08-25T10:44:52+5:30
Tampering in the electricity meter is crime : वीज बिल चुकविण्यासाठी काही जण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात.
- अतुल जयस्वाल
अकोला : वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अपरिहार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही जण विद्युत मीटरमध्ये फेरफार करून महावितरणची फसवणूक करतात, परंतु ही वीज चोरी उघड झाल्यास संबंधित व्यक्तीच्या घरात कायमचा अंधार होऊ शकतो. एवढेच नव्हे तर फौजदारी स्वरुपाची कारवाई होऊन प्रसंगी तुरुंगाची हवा खाण्याचीही वेळ येऊ शकते.
महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक चक्क मीटरमध्येच हेरफेर करतात. वीजचोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.
मीटरजप्ती व मोठा दंड
वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चोरी पकडली गेल्यास त्याला चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. हा
स्वीकारल्यास अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा बहाल केला जाऊ शकतो. तथापी, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर मीटर जप्त करून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणचे पथक सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीज चाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कुणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.
वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वर्ष कारवाया
२०१९ - ८७६
२०२० - ४०४
२०२१ - २६३
वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मीटरमध्ये हेरफेर केल्याचे आढळल्यास अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.
- पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण