अवघ्या ४०० रुपयांत नळ कनेक्शन; अकोलेकरांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:07 PM2019-07-22T14:07:20+5:302019-07-22T14:07:26+5:30
अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास नागरिकांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अकोला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २२ जुलै ते ८ सप्टेंबर या कालावधीत अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ कनेक्शन देण्यासोबतच घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास नागरिकांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या या निर्णयामुळे नवीन नळ कनेक्शन घेणाऱ्या अकोलेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
केंद्र शासनाने २०२४ पर्यंत प्रत्येक घरी नळ कनेक्शन देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालयाचे गठन केले आहे. या सर्व धोरणात्मक बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अकोलेकरांना अवघ्या ४०० रुपयांत नवीन नळ जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. यासोबतच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची गरज लक्षात घेता जे नागरिक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील, त्यांना मालमत्ता करातून पाच टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी अकोलेकरांना ४९ दिवसांची मुदत देण्यात आली असून, ८ सप्टेंबर ही अंतिम मुदत राहील. सदर योजनेत अर्धा इंच आणि पाऊण इंच नळ जोडणीचा समावेश आहे. नवीन नळ जोडणी घेताना अकोलेकरांनी स्वखर्चातून नळाला मीटर लावणे बंधनकारक असून, मजुरीचा खर्च मालमत्ताधारकाला करावा लागणार आहे. यासंदर्भात जलप्रदाय विभागामार्फत मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचे महापौर अग्रवाल यांनी सांगितले. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापौर अग्रवाल यांनी यावेळी केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त संजय कापडणीस उपस्थित होते.
‘हार्वेस्टिंग’साठी प्रमाणपत्र बंधनकारक
रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यापूर्वी संबंधित नागरिकांना मनपाचा जलप्रदाय विभाग व बांधकाम विभागाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे महापौरांनी सांगितले.
शहरात २०० शोषखड्डे करणार!
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी २०० शोषखड्डे केल्या जातील. याकरिता सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. सदर शोषखड्डे शाळा, खुल्या जागा आदी ठिकाणी केले जातील.
कचºयावर प्रक्रिया; निविदा जारी करणार!
घनकचºयावर प्रक्रिया करण्यासाठी लवकरच निविदा प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी दिली. शहरालगतच्या भोड परिसरात कचºयावर प्रक्रिया केली जाईल. तत्पूर्वी शहराच्या चारही झोनमध्ये कचरा संकलन केंद्रात कचºयाचे विलगीकरण क रण्यात येईल. त्यानंतर ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याची भोड येथील डम्पिंग ग्राउंडवर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत किंवा गॅस तयार करण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अतिक्रमण हटाओ’ मोहीम सुरूच राहील!
मुख्य बाजारात पायी चालण्यासाठीही रस्ते शिल्लक नाहीत. यापूर्वी लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांसोबत अनेक बैठका घेऊन त्यांना सूचना केल्या. मुख्य बाजारातील व्यावसायिकांनाही त्यांचे अतिक्रमण स्वत:हून काढण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेत कोणावरही अन्याय होत नसून, अकोलेकरांचे हित लक्षात घेऊनच यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी स्पष्ट केले. यानंतर साइड मार्जिन न सोडणाºया दुकानदार, व्यावसायिकांवर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.