अकोला जिल्ह्यात नवीन १५,४८२ घरकुलांचे उद्दिष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 10:49 AM2020-11-03T10:49:42+5:302020-11-03T10:49:53+5:30
Akola News एकूण १५ हजार ४८२ घरकुलांचे उद्दिष्ट शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे.
अकोला: प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात नवीन १५ हजार ४५२ घरकुलांचे उद्दिष्ट शासनामार्फत देण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) साैरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) २६ ऑक्टोबर रोजी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी ४०७, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी १३७ व इतर प्रवर्गातील लाभार्थींसाठी १४ हजार ८७५ अशा एकूण १५ हजार ४८२ घरकुलांचे उद्दिष्ट शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील पंचायत समित्या अंतर्गत प्राप्त घरकुल लाभार्थींच्या याद्यांची तपासणी करून, लाभ देण्यात आलेले लाभार्थी, पक्के घर असलेले लाभार्थी, घरकुलासाठी जागा उपलब्ध नसलेले लाभार्थी व अपात्र ठरलेले लाभार्थी वगळून मूळ प्रतीक्षा यादीतील व घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध असलेल्या पात्र लाभार्थींचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
पंचायत समितीनिहाय असे
आहे घरकुलांचे उद्दिष्ट!
पंचायत समिती घरकुल
अकोला २७५२
अकोट ३६३७
बाळापूर २१३५
बार्शीटाकळी १०२०
मूर्तिजापूर १८८९
पातूर १२७८
तेल्हारा २७७१
.....................................
एकूण १५,४८२