अकोला मनपासमोर १८ हजार वृक्ष लागवडीचे ‘लक्ष्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:27 PM2018-04-14T13:27:49+5:302018-04-14T13:27:49+5:30
अकोला : महापालिक ा प्रशासनाला यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची अमरावती येथे विभागीय कार्यालयात बैठक पार पडली
अकोला : महापालिक ा प्रशासनाला यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची अमरावती येथे विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. प्रशासनाने गतवर्षी वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष. त्यामुळे गतवर्षात किती झाडे बहरली, याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उन्हाळ््यात अकोला शहराचा चढलेला पारा अनेकांना असह्य ठरतो. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, ती कमी करण्यासाठी केवळ वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करण्याचा एकमेव पर्याय आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने दरवर्षी पावसाळ््यात वृक्ष लागवडीची मोहीम राबवल्या जाते. गतवर्षी शहरात सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यावेळी झाडे लावत असताना बांधकाम विभागाच्यावतीने मोबाइलमधील ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर करून, त्यांची नोंद घेण्यात आली होती. यंदा मनपा प्रशासनाला १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.
गतवर्षीच्या वृक्षांचे काय झाले?
मनपा प्रशासनाने गतवर्षी शहराच्या विविध भागात सहा हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांची मदत घेण्यात आली होती. तसेच महापालिका शाळेतील शिक्षकांना किमान पाच वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वृक्ष लागवड करताना त्यांची ‘जीपीएस’ प्रणालीद्वारे नोंद घेणे बंधनकारक करण्यात आले होते. सहा हजारपैकी किती वृक्षांचे संगोपन झाले, याची माहिती समोर येण्याची गरज आहे.
‘ग्रीन झोन’मध्ये १३ हजार वृक्ष लागवड
१८ हजार वृक्षांपैकी १३ हजार वृक्षांची लागवड शहराच्या विविध भागातील निर्माणाधिन ‘ग्रीन झोन’मध्ये केली जाणार आहे. सद्यस्थितीत मनपाच्या स्तरावर शहरातील १२ खुल्या भूखंडांवर हरित पट्टे निर्माण केले जात आहेत. या ठिकाणी १३ हजार वृक्ष लावल्या जातील. यामुळे शहराचे तापमान कमी होण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनाला नक्कीच हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.