अकोल्यात नवीन ४००० बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:48 PM2019-06-16T13:48:34+5:302019-06-16T13:48:44+5:30
अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा, यासाठी उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट निर्माण करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेने ठरविले आहे. त्यानुषंगाने महिला बचत गटांच्या वाढीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ‘वर्धिनी’ गावा-गावांत जाऊन महिलांचे प्रबोधन करीत आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट स्थापन करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या वाढीसाठी आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ व योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ७५ वर्धिनींची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धिनी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या या महिला जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम, आदिवासी व पुनर्वसित गावांमध्ये जाऊन महिला बचत गट गठित करण्याचे काम करीत आहेत. गावा-गावांत जाऊन प्रबोधन करीत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘वर्धिनी’ प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यात नवीन चार हजार महिला बचत गट स्थापन करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘वर्धिनी‘ गावा-गावांत जाऊन महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण व गावातच रोजगार उपलब्ध करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.