साचलेल्या मातीवर डांबरीकरण ; शिवसेनेने काम थांबविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:21 AM2021-01-19T04:21:04+5:302021-01-19T04:21:04+5:30
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला हाेता. सप्टेंबर ...
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्ये राज्य शासनाकडे सादर केला हाेता. सप्टेंबर २०१६ मध्ये शासनाने हद्दवाढीला मंजुरी दिली. त्यामध्ये भाैरद ग्रामपंचायतमधील लक्ष्मीनगर, गजानननगर, लुंबिनीनगर, डाबकी आदी भाग मनपा क्षेत्रात समाविष्ट झाला. दरम्यान, हद्दवाढ केल्यानंतर संबंधित भागातील विकासकामांसाठी शासनाकडून निधी दिला जाताे. शासनाने यासाठी ९६ काेटी २० लाख रुपये निधी मंजूर केला. या निधीतून भाजपच्या लाेकप्रतिनीधींनी विकासकामे सूचविली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, सभागृह, उद्यानांचे साैंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे. हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामे सुरुवातीपासूनच निकृष्ट व दर्जाहीन बांधकामामुळे वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये कॅनाॅल ते राधिका ऑइल मिलपर्यंत मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले. परंतु रस्त्यावरची माती न उचलताच त्यावर डांबराचा थर अंथरल्या जात असल्याचा प्रकार शिवसेनेने उघडकीस आणत सदर काम बंद केले आहे.
दर्जेदार रस्त्यासाठी सेना आग्रही
मातीवर टाकलेला डांबरी थर काढून घ्यावा,अन्यथा काम सुरू हाेऊ देणार नसल्याची भूमिका सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, शहरप्रमुख अतुल पवनिकर यांनी घेतली आहे. सेनेच्या इशाऱ्यानंतर गाेल्डी नामक कंत्राटदार दर्जेदार काम करताे की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
अभियंता म्हणाले, कंत्राटदाराने चूक केली!
प्रभाग क्रमांक ८ मधील रस्ता रुंदीकरणाच्या कामावर मनपाने नियुक्त केलेल्या अभियंत्याने कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे शिवसैनिकांसमाेर स्पष्ट केले. हा थर काढून घेत नव्याने काम करण्याचे निर्देश दिल्या जातील,असे त्यांनी नमूद केले.