लाचखोरांविरूद्ध तरूणाईचा पुढाकार
By admin | Published: August 21, 2015 12:30 AM2015-08-21T00:30:54+5:302015-08-21T00:30:54+5:30
आठ महिन्यात ३५७ युवकांनी केल्या तक्रारी.
नीलेश शहाकार/बुलडाणा : लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत समाजात, विशेषत: युवा वर्गात जागरूकता वाढत असल्याचे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालानुसार गत आठ महिन्यात २५ वर्षापेक्षा कमी वयाचे ८४ युवक आणि २६ ते ३५ वर्षे वयोगटातील २७३ युवकांनी विभागाकडे तक्रारी करुन लाचखोरांविरूद्ध कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र दिसते. कोणतेही काम करताना सामान्य नागरिकांची पावलोपावली लाचखोरांशी गाठ पडते. अनेक वर्षांंपासून फोफावलेल्या या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराविरूद्ध गत काही वर्षापासून शासनाने कायद्याची कडक अमंलबाजावणी सुरु केली आहे. त्यामुळे जनतेमध्येही याबाबत जागरूकता निर्माण होत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार जानेवारी २0१५ पासून १0 ऑगस्ट २0१५ पर्यंंत राज्यात लाचखोरीच्या जवळपास ७२३ तक्रारी नोंदविण्यात आला. त्यानुसार राज्यातील आठही विभागात ७३0 कारवाया करण्यात आल्या. विशेष म्हणजे या कारवाया ज्यांच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आल्या, त्या तक्रारकर्त्यांंमध्ये युवकांचा मोठा सहभाग आहे.
*तक्रारदारांमध्ये भूमिका महत्वाची
लाचखोरांविरूद्धच्या कारवाईत तक्रारदाराची भूमिका महत्वाची असते. त्यांच्या मदतीनेच दोषींवर कारवाई करुन लाचखोरांना लगाम लावणे शक्य होते. याकामी युवकांचा पुढाकार वाढला आहे. जानेवारी २0१५ पासून १0 ऑगस्ट २0१५ पर्यंंत राज्यात भ्रष्टाचाराच्या ७२३ तक्रारी नोंदविण्यात आल्या. यामध्ये २५ वर्षाखालील ८४ तक्रारदार होते. २६ ते ३५ वयोगटातील २७३, तर ३५ ते ४५ वयोगटातील १९0 तक्रारदार होते. ४६ ते ६0 वयोगटातील १४४ तक्रारदार, तर ६0 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ३२ होती.
*तक्रारकर्त्यांंचा आलेख
तक्रारकर्त्यांंचे वय टक्केवारी
२५ वर्षापेक्षा कमी १२ टक्के
२६ ते ३५ वर्ष ३८ टक्के
३६ ते ४५ वर्ष २६ टक्के
४६ ते ६0 वर्ष २0 टक्के
६0 वर्षापेक्षा जास्त 0४ टक्के